मुंबई : परदेशी विशेषतः अमेरिका आणि कॅनडा येथील नागरिकांना संपर्क करून गूगल कंपनीकडून बोलत असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आठ जणांना गोरेगाव येथून अटक करण्यात आली आहे. आपली तसेच आपल्या कंपनीची गूगलवरील सेवा खंडीत झाल्याची किंवा चुकीची नोंदणी झाल्याचे सांगून सेवा पूर्ववत करण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळण्यात येत होते. वनराई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गोरेगाव पूर्वेकडील जयप्रकाशनगरमध्ये बेकायदा कॉल सेंटर सुरू आहे. या कॉल सेंटरमधून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची माहिती वनराई पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामप्यारे राजभर यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. डी. एम. एंटरप्राइजेस नावाने असलेल्या या कॉल सेंटरमध्ये अनेक संगणक असल्याचे दिसून आले. तसेच फोन आणि मोबाइलवर काही व्यक्ती बोलत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडे कॉल सेंटर चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या सरकारी परवानग्यांबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतीच परवानगी नसल्याचे दिसून आले. पोलिसांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता कॉल सेंटरचा मालक आणि तेथील कर्मचारी नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे समोर आले. पोलिसांनी फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच मालकासह आठ जणांवर वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अमेरिकन आणि कॅनडामध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना कॉल सेंटरमधील कर्मचारी इंटरनेट कॉल किंवा संदेश पाठवून संपर्क साधत. यामध्ये गूगल कंपनीचे अधिकृत कर्मचारी असल्याचे भासविले जात असे. गूगलच्या पडताळणी विभागातून बोलत असल्याचे हे कर्मचारी सांगत. व्यावसायिकाने गूगलवर त्याची किंवा त्यांच्या व्यवसायाची नोंदणी केली आहे का, अशी विचारणा केली जात असे. नोंदणी केलेली असल्यास सध्या सेवा बंद असल्याचे सांगून पुन्हा सेवा सुरू करण्यासाठी एक अर्ज पाठवला जात असे. हा अर्ज भरून सोबत ९९ अमेरिकन डॉलर्स ते भारतीय रुपयांमध्ये पाठविण्यास भाग पाडले जात असे.
परदेशी नागरिकांनी पैसे पाठविल्यानंतर एका अॅपच्या माध्यमातून त्यांची गूगल सेवा सुरू झाल्याचे भासविण्यात येई. प्रत्यक्षात असे काहीच केले जात नव्हते.
या कॉल सेंटरमधून पोलिसांनी ११ हार्ड डिस्क, रायटर्स तसेच इतर संगणकीय साहित्य हस्तगत केले. यातील डाटामधून नेमक्या किती जणांना या टोळीने फसविले याबाबत स्पष्टता होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.