मुंबई : महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करुन नवी शिवसेना स्थापन केली त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ‘स्वाभिमान दिन’ ठाकरे गट ‘जागतिक खोके दिन’ तर राष्ट्रवादी गद्दार दिन म्हणून साजरा करत आहेत. मात्र राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेला हानी पोहोचू नये यासाठी मुंबई पोलिसांनी ठाकरे गटाच्या खोके दिनाला प्रतिबंध केला आहे. तशा नोटिसाच ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांसह माजी नगरसेवकांना व पदाधिका-यांना पाठवण्यात आल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी याच दिवशी बंड केल्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाच्या रात्रीच म्हणजेच २० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदार आणि खासदार यांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड केले होते.
या सर्व घडामोडी घडून आज एक वर्ष पूर्ण झाले आहे . या निमित्ताने आज खोके दिन तसेच गद्दार दिन साजरा केला जात आहे. ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. मात्र यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखां सोबतच माजी नगरसेवकांना आणि काही नेत्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
अशाप्रकारे कुठलाही दिन साजरा करण्यास मुंबई पोलिसांनी प्रतिबंध केला आहे. हे दिन साजरा केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना या नोटीसमध्ये देण्यात आल्या आहेत. तर सोशल मिडियावर शेअर होणाऱ्या पोस्ट आणि इतर गोष्टी यामुळे गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आहेत.
दरम्यान, दक्षिण मुंबईमध्ये खोके दिन साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे बजावले आहे.