मुंबई : कालचा दिवस महाराष्ट्रातील राजकारणातील मोठी घडामोड घडवणारा ठरला.काल महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरण बदलवून टाकले. काल राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये अजित पवार यांच्यासह पक्षातील इतर ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर समितीच्या सूचनेवरून त्या ९ जणांचे सदस्यत्व रद्द करण्याची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे ईमेलद्वारे दाखल केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
सदरील याचिकेवर अभ्यास करून ९ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेणार असल्याचे मोठे विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.
राहुल नार्वेकर म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ९ आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका सादर केलेली आहे. ती मी वाचून घेऊन. त्यात नमूद केलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करून योग्य निर्णय घेईल. सभागृहातील विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा निर्णय सभापती घेतात. यावर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. त्यामुळे विधानसभेच्या नियमांनुसार सर्व घटनात्मक तरतुदी लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेणे आवश्यक असेल असेही ते म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ९ सदस्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांना कोणतीही कल्पना न देता पक्ष धोरणाच्या, हिताच्या विरोधात जाऊन शपथ घेतली. ती त्यांची कृती बेकायदेशीर असून पक्षाला अंधारात ठेवल्याने याबाबत एका सदस्याने शिस्तभंग समितीकडे तक्रार केली. त्यानंतर समितीच्या सूचनेवरून त्या ९ जणांचे सदस्यत्व रद्द करण्याची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे ईमेलद्वारे दाखल केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत दिली होती.