मुंबई : ९ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेली रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाची जाहीर सभा हवामान वेधशाळेने जाहीर केलेल्या मुसळधार पावसाच्या अंदाजामुळ पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम, दिनांक ९ जून २०२३ रोजी, (केडगाव) अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, वेधशाळेच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक व प्रशासनाची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच वेधशाळेच्या सतर्कतेच्या इशाऱ्याचे पालन करून आपण वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे पवार म्हणाले.
सध्या जाहिरातबाजी आपल्या राज्यात प्रचंड मोठ्याप्रमाणावर होत आहे. ‘शासन आपल्या दारी’ शासनाने जो उपक्रम सुरू केला आहे त्यात काही ठिकाणी खुर्च्या रिकाम्या दिसत आहे. त्याचे फोटो येत आहेत. मंत्र्यांचा तोल जातो आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जाहिराती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात असताना अतिशय चुकीच्या व खोट्या आणि शासनाने निर्णय न घेतलेल्या जाहिराती दाखवून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली जात आहे असा थेट आरोप अजित पवार यांनी केला. मी हे राजकीय हेतूने बोलत नाही हे सांगतानाच दोन तरुणी चर्चा करत आहेत. शासनाने संजय गांधी निराधार योजना सुरू केली आहे. त्यापासून शेतकरी बेरोजगारांना लाभ मिळतो त्यासंबंधीचे कागदपत्रे एकाच ठिकाणी एक खिडकीवर मिळणार आहे. वास्तविक ही योजना स्वर्गीय अंतुलेसाहेबांनी त्यांच्या काळात सुरू केली. त्यावेळेपासून अनेक राज्यकर्ते आले परंतु कुणीही ती योजना बंद केली नाही. ती योजना गोरगरीब निराधारांच्या फायद्याची होती उलट त्यात प्रत्येकवेळी रकमेत वाढ करण्यात आली. आता या योजनेचा लाभ फक्त ६५ वर्षावरील लोकांनाच मिळतो. त्यामध्ये विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, तृतीयपंथी यांना शासकीय अधिकाऱ्यांच्या दाखवल्यानंतरच योजनेचा फायदा मिळतो आणि इथे शासनाच्या जाहिरातीत दोन मुली चर्चा करत आहेत. काय चाललंय आहे. इतकं धादांत खोटं…? त्या दोघांनी (शिंदे – फडणवीस) बसावं आणि आपली जाहिरात नीट येते का नीट दाखवतात का हे तरी बघावं असा टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लगावला.
दुसर्या जाहिरातीबाबत बोलताना चार – पाच सुशिक्षित तरुण चर्चा करत आहेत ‘आम्हाला शिकून नोकर्या नाहीत’ त्यात एक क्रिकेटपटू चेंडू त्यांच्याकडे भिरकावतो आणि त्यांच्यामध्ये येऊन विचारपूस करतो ‘तुम्हाला रोजगार आहे?’ शासनाची रोजगार हमी योजनेंतर्गत काम मिळू शकते. शासनाची रोजगार हमी योजना कुणाकरता आहे. याचं डोकं ठिकाणावर आहे का? त्यांची सटकली आहे. असा जोरदार हल्लाबोल अजित पवार यांनी केला.
आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर विचारले असता पवार म्हणाले की आमच्या महाविकास आघाडीमध्ये असणारे तिन्ही पक्ष ४८ जागांची चाचपणी करत आहेत. चाचपणी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे असेही अजित पवार म्हणाले. लवकरच पुणे आणि चंद्रपूरची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या निवडणूका जाहीर होण्याअगोदर जागा कुणी लढवायच्या यावर चर्चा होईल. चंद्रपूर तर कॉंग्रेसची आहे आणि पुणे जागेबद्दल कॉंग्रेसचे वेगळे मत आहे, आमचेही वेगळे मत आहे. त्यातून आम्ही मार्ग काढू असेही अजित पवार म्हणाले.