मुंबई : राज्यात मेडिकल डिप्लोमा आणि फेलोशिपसाठी दिल्या जाणाऱ्या सुमारे १ हजार जागा कमी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शिक्षण आणि औषध विभागानं (एमईडीडी) एका मोठ्या कारवाईत कॉलेज ऑफ फिजिशियन ॲण्ड सर्जनद्वारे (सीपीएस) वैद्यकीय विद्यार्थ्यांना फेलोशिप आणि डिप्लोमा पदवी देणारे 26 अभ्यासक्रम रद्द केले आहेत. सीपीएसशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळून आल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कॉलेज ऑफ फिजिशियन ॲण्ड सर्जन (सीपीएस) मार्फत चालवल्या जाणाऱ्या पोस्ट ग्रॅज्युएशन मेडिकल डिप्लोमा कोर्सचे भवितव्य गेल्या काही महिन्यांपासून टांगणीला लागले होते.
गेल्या वर्षी एमएमसीने (मेडिकल डिप्लोमा) सीपीएसशी संलग्न १२० वैद्यकीची तपासणी केली होती, त्यापैकी ७४ महाविद्यालयांनी तपासणी करण्यासाठी नकार दिला होता. तर तपासणीदरम्यान असे आढळून आले, की अनेक संस्थांमध्ये डिप्लोमा शिकवणाऱ्या प्राध्यापकांची कमतरता आहे आणि अनेक संस्थांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे नॅशनल मेडिकल कौन्सिल (एनएमसी) च्या नियमांचे उल्लंघन होते. एमएमसी म्हणजेच महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलने वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाला (एमईडीडी) आपल्या अहवालात वरील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या, ज्यानंतर एमईडीडीने सीपीएसच्या प्रवेश प्रक्रियेवर स्थगिती आणली.
एमएमसीशी संबंधित एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की ७० महाविद्यालयांनी एमएमसीला महाविद्यालयांची तपासणी करण्याची विनंती केली होती, आम्ही जूनअखेरपर्यंत अनेक महाविद्यालयांची तपासणी केली आणि आम्हाला पुन्हा त्याच त्रुटी आढळल्या. महाविद्यालयांमध्ये एकही पात्र शिक्षक, आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत, या परिस्थितीमुळे एनएमसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्ण उल्लंघन होते. आम्ही आमच्या तपासणीचा अहवाल एमईडीडीला दिला आहे, त्यानंतर सीपीएस अभ्यासक्रम रद्द करण्यात आला आहे. सीपीएस अध्यक्ष डॉ. डी. गिरीश यांच्याकडून याबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.