मुंबईः व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून व्यावसायिकाची ५० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी कंपनीच्या दोन भागिदारांविरोधात गुन्हा दाखल केला.तक्रारदार मोहम्मद अब्दुल्ला सिद्धीकी (५०) वास्तुविशारद असून ते कुटुंबियांसोबत जोगेश्वरी पश्चिम येथे राहतात. त्यांचे कांदिवली पश्चिम येथे कार्यालय आहे. या कार्यालयातच डिसेंबर, २०१९ मध्ये त्यांना परिचित फहिम सिद्धिकी भेटले. आपली स्काय लाईट कंपनी असून या कंपनीत इरशाद अन्सारीही भागीदार असल्याचे फहिम सिद्धिकी यांनी त्यांना सांगितले. आपली कंपनी चित्रीकरणासाठी लागणारी उपकरणे पुरवते.
या कंपनीत ५० लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास दर महिना एक लाख रुपये मिळतील, असे फहिम सिद्धिकीने त्यांना सांगितले. मोहम्मद सिद्धीकी यांना प्रस्ताव आवडल्यामुळे त्यांनी रोख ५० लाख रुपये फहिम सिद्धिकी व इरशाद यांना दिले. त्यानंतर उभयतांमध्ये याबाबत करार करण्यात आला. तसेच सुरक्षेसाठी तक्रारदारांना धनादेशही देण्यात आले. सुरूवातीला पाच महिने तक्रारदारांना दर महिन्याला एक लाख रुपये मिळाले. त्यानंतर रक्कम मिळणे बंद झाले. त्यामुळे तक्रारदारांनी दोघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे दूरध्वनी बंद असल्याचे आढळले.
त्यामुळे तक्रादारांनी त्यांच्याकडील धनादेश बँक खात्यात जमा केला. पण तो वठला नाही. चौकशी केली असता दोघांनीही कंपनीचे कार्यालय बंद केल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे समजल्यानतंर मोहम्मद सिद्धीकी यांनी कांदिवली पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फहिम सिद्धिकी व इरशाद अन्सारीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.