मुंबई : आजही समाजातील अनेक अत्याचार पीडीत महिला तक्रार दाखल करायला पुढे येत नाही. त्यामुळे अनेक गुन्हे हे रेकॉर्डवर येत नाही. विशेषता पोलिस ठाण्यात जायला महिला कचरतात. ही बाब लक्षात घेवून मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दर शनिवारी महिलांसाठी तक्रार निवारण दिनाचा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाला एक वर्ष पुर्ण झाले असून महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून आतापर्यत हजारो महिलांच्या तक्रारीचे निवारण झाले आहे. शिवाय महिला आणि पोलिसांमध्ये विश्वासाचे नाते तयार होत आहे.
मुंबईतील सर्वच्या सर्व ९३ पोलिस स्टेशन महिलांनी गजबजून गेल्याचे चित्र असते… निमित्त होते महिला तक्रार निवारण दिनाचे. एकट्या शनिवारी मुंबईच्या सर्व पोलिस स्टेशनमध्ये एकुण १७०६ तक्रारदार हजर होते. त्यापैकी ९११ महिला तक्रारदारांचा समावेश होता. महिलांच्या अडचणी समजून घेण्यासाठी संबधित पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षकांसह सर्व अधिकारी उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे या महिलांसोबत संवाद साधून त्यांच्या शंकेचे निरसन केले जाते.विवेक फणसाळकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाची सुत्रे घेतल्यानंतर हा उपक्रम तातडीने सुरु केला होता. हळूहळू या उपक्रमाच्या निमीत्ताने पोलीस ठाण्याबद्दलची महिलांमधील भिती आता कमी होताना दिसत आहे. या उपक्रमाने घडवून आणला हा सकारात्मक बदल असल्याचे पोलीस आय़ुक्त विवेक फणसाळकर यांचे म्हणणे आहे.
महत्वाचे म्हणजे हा उपक्रमावर वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे काटेकोरपणे लक्ष असते.या दिवशी प्रत्येक पोलिस ठाण्याला विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्तासह प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तव परिमंडळप पोलीस उप आयुक्त भेटी देत असतात. आयुक्तांच्या कल्पनेतून सुरु झालेल्या या उपक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निमीत्ताने मोठ्या संख्येने महिला ,पोलिस ठाण्यात येत आहे. संबधित पोलिस अधिकारी संवाद साधून त्यांच्या तक्रारीचे निवारण करत असून यावर वरीष्ठांचे लक्ष असते.
१.महिलांच्या अडचणी समजून घेणे
२. प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करणे
३.महिलांच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही
४.महिला- पोलिसांमध्ये विश्वासाचे नाते तयार करणे
५. पोलिस तक्रार निवारण कक्ष एक्टीव,अपडेट ठेवणे
६. महिलांनी केलेल्या तक्रारीची अपडेट माहिती देणे