मुंबई : अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ आमदारांचा रविवारी दुपारी शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्याला खुद्द अमोल कोल्हे उपस्थित होते. एवढेच नाही, तर कार्यक्रमानंतर अमोल कोल्हेंचा सुधीर मुनगंटीवार यांच्या पाया पडतानाचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात सहभागी झाल्याचे सांगितले जात होते. अजित पवारांनीही सगळ्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र, आज अमोल कोल्हेंनी आपण शरद पवारांसोबतच असल्याचे ट्वीट करून स्पष्ट केले आहे. ‘जब दिल और दिमाग में जंग हो, तो दिल की सुनो. शायत दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है. पर दिल कभी नहीं. मी साहेबांसोबत’, अशा शब्दांत अमोल कोल्हेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, शपथविधीबाबत आपल्याला माहिती नव्हती, असा दावा अमोल कोल्हेंनी एका वृत्तवाहिनी सोबत बोलताना केला. ‘मी शरद पवारांसोबतच आहे. मी त्यांना भेटून सविस्तर प्रतिक्रिया देईन. मी काल एका वेगळ्या कामासाठी भेटायला गेलो होतो. मला शपथविधीची कल्पना नव्हती’, असे अमोल कोल्हे म्हणाले.