मुंबई (शुद्धोदन कठाडे) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते संसद भवनाचे उद्घाटन करण्याऐवजी पंतप्रधान नरंद्र मोदी यांच्या हस्ते करू नये अन्यथा आगामी लोकसभेत आमची सत्ता आल्यास संसद भवनाचे राष्ट्रपतींच्या हस्ते पुन्हा उद्घाटन करू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची पाटी काढून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची नवीन पाटी लावू असा इशारा
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रस्थापित भाजपा सरकारला दिला आहे .
येत्या 28 मे रोजी देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मात्र, विरोधी पक्षाने या संसद भवनाच्या सोहळ्याला कडाडून विरोध केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात यावे अशी मागमी विरोधकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची सत्ता गेली आणि आम्ही सत्तेत आलो तर संसद भवनाचे पुन्हा उद्घाटन करू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तेच आम्ही उद्घाटन करू. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची संसद भवनावरील नेम प्लेटही काढून टाकू, असे प्रकाश आंबेडकर यांनी बजावले आहे.
वंचित बहुजन आघाडीने भांडुप येथे आयोजित केलेल्या संविधान बचाव सभेत त्यांनी हा इशारा दिला. मोदी प्रचंड प्रसिद्धीलोलूप आहेत. प्रसिद्धीसाठी हावरट आणि हपापलेले आहेत. त्यांना बाजूला मंत्रीही चालत नाही. सेक्युरिटी गार्डही नकोत. उद्घाटनाच्या दगडावर फक्त आपलेच नाव असावे असा त्यांचा हट्ट असतो. त्यांना संघाचा सपोर्ट आहे, त्यामुळे ते तसे वागतात असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला.
उद्धव ठाकरेंना सल्ला
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीपासून सावध राण्याचा सल्लाही दिला. शिवसेनेला आम्ही सावध करतोय. वेळीच सावध व्हा. भाजपकडून जे ईडीचे डाव टाकले जात आहेत. त्यात राष्ट्रवादी अडकणार आहे. तर काँग्रेस नेते नाना पटोले कधी गरम तर कधी नरम बोलत आहे. त्यामुळे पटोले यांची भूमिकाही तपासून घ्या. नाही तर तुमचा बळी जाईल. म्हणूनच तुम्हाला सावध करत आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
आम्ही त्यांच्यासोबत नाही
दिल्ली सरकार विरोधात केंद्र सरकारने अध्यादेश काढला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमची अरविंद केजरीवाल यांना सहानुभूती आहे. पण आम्ही मात्र, त्यांच्यासोबत आहोत असे नाही, असे ही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी म्हणते वंचितला जागा देणार नाही. पण आम्ही त्यांना जागा मागितल्याच नाहीत. ज्याला सत्तेत जायचे आहे, त्यांना आम्हाला सोबत घेतल्याशिवाय सत्तेत जाता येणार नाही, असेही ते म्हणाले.
तर भाजप 48 जागा जिंकेल
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस वेगळी लढली आणि राष्ट्रवादीचे काही नेते भाजपमध्ये गेले तर भाजप 48 जागा जिंकू शकतो, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांच्यामागे ईडी लागली आहे. त्यांच्यासमोर जेल की स्वातंत्र्य हे दोनच पर्याय असतील, तेव्हा भाजप त्यांना आपल्यात सामावून घेईल. तेव्हा आश्चर्य वाटून घेऊ नका, असेही ते म्हणाले.