ठाणे : वागळे इस्टेट गुन्हे शाखेने ३० लाख रुपयांचा अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. कोपरी येथील मंगला हायस्कुलजवळ काही व्यक्ती अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून ३० लाख रुपयांचे २ किलो ६० ग्रॅम चरस हा अमली पदार्थ जप्त केला आहे. तर, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके हे अमली पदार्थ बाळगणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करत असताना, त्यांना कोपरी भागातील मंगला हायस्कुल जवळ प्रशांत कुमार रामबाबू सिंग (२७) आणि प्रेमशंकर लक्ष्मीनारायण ठाकूर (२३) हे दोघे बिहारहून ३० लाख रुपये किंमतीचा २ किलो ६० ग्रॅम वजनाचा चरस हा अमली पदार्थ विक्रीसाठी आले असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्या भागात सापळा रचला. यामध्ये बेकायदेशीररित्या अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून २९ ॲागस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या तपासात पोलिसांना नेपाळी चलनी नोटा मिळाल्या असून हा अमली पदार्थ त्यांनी नेपाळहून आणला असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.