ठाणे : वागळे इस्टेट येथील श्रीनगर भागात मनिष उतेकर (२४) या पदवीधर मुलाने शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनिष हा सैन्य आणि पोलीस भरतीची तयारी करत होता. आत्महत्येपूर्वी मनिष याने एक संदेश त्याच्या कुटुंबियांना पाठविला आहे. त्यामध्ये त्याने वाहतूक पोलिसांची कारवाई झाल्यानंतर पोलिसांनी करिअर संपविण्याची भिती घातल्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणात श्रीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणाची चौकशी केली जाईल असा दावा पोलिसांनी केला आहे.
इंदिरानगर येथील हनुमान नगर परिसरात मनिष उतेकर हा वास्तव्यास होता. त्याचे पदवी पर्यंतचे शिक्षण झाले असून मागील काही महिन्यांपासून तो सैन्य आणि पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता. दीप अमावस्यादिवशी मनिष त्याच्या दोन मित्रांसोबत दुचाकीने कोपरी येथे गेला होता. त्यावेळी मनिषवर कोपरी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई केली होती. घरामध्ये कोणीही नसताना मनिष याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने व्हॉट्सॲपवर काही स्टेट्स ठेवले होते. त्यामध्ये आई-वडिलांसोबतचे छायाचित्र होते. तसेच वाहतूक पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांवर केलेल्या आरोपाचा संदेश त्याने त्याच्या आईला पाठविला होता. दरम्यान, या घटनेची माहिती मनिष याच्या मित्रांना मिळाल्यानंतर त्यांनी तीन हात नाका येथील ठाणे वाहतूक शाखेच्या कार्यालयात उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांची भेट घेतली. तसेच कारवाईची मागणी केली. यासंदर्भात डॉ. विनयकुमार राठोड यांना संपर्क साधला असता, पोलिसांनी नियमानुसार कारवाई केली होती असे सांगितले. तर, श्रीनगर पोलिसांनी याप्रकरणात चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.
मनिष उतेकर यांनी त्यांच्या संदेशामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर आरोप केले. ‘मी आर्मी भरती देणारा विद्यार्थी आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविल्याची कारवाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पोलिसांची माफी मागितली. तसेच वाहतूक शाखेत दंड भरायला तयार होतो. पण आम्हाला न्यायालयात जाण्याची धमकी देण्यात आली. माझ्यासमोर अनेक दुचाकी चालक लाच देऊन सुटत होते, असे त्याने संदेशाच्या सुरुवातीला म्हटले. मी पुन्हा तिसऱ्या दिवशी माफी मागायला गेलो. तसेच न्यायालयात गेल्यास माझे करिअर संपेल, तुम्ही काय दंड आहे तो येथेच घ्या, मी द्यायला तयार आहे, असे म्हटल्यानंतर तुझे करिअर संपवायचे आहे, अशी भिती दाखविण्यात आली. या सर्व भितीमुळे मी आत्महत्या करत आहे. दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे लिहून त्यांनी भिती दाखविल्याचे मनिषने म्हटले आहे. त्यानंतर पुढे मनिष याने ‘आज माझ्यावर वेळ आली आहे, उद्या कोणावर यायला नको. मी वाहतूक पोलिसांचा मान ठेवतो. परंतु असे कधी कोणासोबत वागू नका, जेणेकरून समोरचा माणूस मानसिक तणावातून आत्महत्या करेल. ती दुचाकी माझ्या मित्राची आहे. त्यांची काही चूक नाही. त्याने पुन्हा त्या दोन कर्मचाऱ्यांची नावे घेत त्यांच्या दबावामुळे मी आत्महत्या करत असल्याचे म्हटले.