ठाणे : सिबिल स्कोअर वाढवून घरासाठी कर्ज मंजूर करून देण्याचे प्रलोभन दाखवून एका व्यक्तीची सव्वा लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. या प्रकरणात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कल्याणमध्ये वास्तव्यास असलेला तक्रारदार पत्नीसह कॅबने प्रवास करत होते. त्यांच्या घराच्या कर्जाविषयी चालू असलेली चर्चा टॅक्सी चालकाने ऐकली आणि चालकाने घरासाठी तुम्हाला कर्ज मिळवून देऊ, तसेच सिबिल स्कोअरही चांगला करून देण्याचे आश्वासन दिले. तुमचे १०० टक्के काम होईल. माझ्या ओळखीचा एक व्यक्ती असल्याचे तो म्हणाला. चालक दाम्पत्याला सोडून निघून गेला. तक्रारदाराला अन्य एका व्यक्तीचा मेसेज आला. तसेच, तक्रारदाराने त्याच्या पत्नीची कागदपत्रे या व्यक्तीच्या व्हॉट्सॲपवर पाठवली. या व्यक्तीने ८० लाखांचे कर्ज मंजूर करण्यासाठी ८५० सिबिल स्कोअर पाहिजेत, मात्र तितका नसल्याने तो वाढवण्यासाठी एक लाख रुपये लागतील, असे सांगितले. दरम्यान, घर घेण्यासाठी पैशांची गरज असल्याने आरोपींना एकूण एक लाख रुपये ऑनलाइनद्वारे पाठवले. मात्र, आरोपींनी आणखी पैशाची मागणी केल्यानंतर त्यांनी नकार दिला. तसेच, पैसेही परत केले नाहीत. तक्रारदाराने दोघांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली.