ठाणे : आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून चार भामट्यांनी उल्हासनगर येथील व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये सात हजार दिरहम आणि चार हजार ५० रुपयांची रोकड अशी एकूण १ लाख ६५ हजार ५० रुपयांची रक्कम आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर येथे २८ वर्षीय व्यक्ती राहतात. त्यांचा उल्हासनगरमध्ये कापड व्यवसाय आहे. त्यांना दुबई येथे फिरण्यासाठी जायचे असल्याने ते ऑनलाईन कार सेवा पुरविणाऱ्या कारने मुंबई विमानतळाच्या दिशेने जात होते. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ते खारेगाव टोलनाका येथे आले असता, दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांची कार अडविली.
आम्ही आयकर विभागाचे अधिकारी असून तुम्ही बेकायदेशीररित्या डाॅलर वापरत असल्याचे त्यांनी व्यापाऱ्याला सांगितले. तसेच त्या भामट्यांनी त्यांची बॅग तपासण्यास सुरूवात केली. व्यापाऱ्याच्या पाकिटामध्ये दिरहम आणि भारतीय चलन होते. दुबईला फिरण्यासाठी जात असल्याने हे चलन असल्याचे त्यांनी भामट्यांना सांगितले. काही वेळानंतर आणखी दोनजण त्याठिकाणी आले. त्यांनी व्यापाऱ्याची चौकशी करण्यास सुरूवात केली. यातील एकजण व्यापाऱ्याच्या ओळखीचा होता. त्यांनी व्यापाऱ्याकडून पैसे घेतल्यानंतर तिथून पोबारा केला. याप्रकरणी व्यापाऱ्याने कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.