डोंबिवली : महिलांना हेरुन त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी अवघ्या १२ तासात अटक केली आहे. आकाश पारचे व कुणाल देहडे अशी अटक आरोपींची नावे आहेत. या चोरट्यांनी २० मिनीटांच्या कालावधीत दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरुन धूम ठोकली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटिव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्यांना अटक केली आहे. यातील आकाश हा सराईत गुन्हेगार असून महिनाभरापूर्वीच तो जेलमधून बाहेर आला होता. कल्याण पूर्वेत रस्त्याने चालणाऱ्या एका महिलेच्या मानेवर थाप मारत दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली. त्यानंतर चोरट्या कल्याण पश्चिम परिसरात गेले असता तेथे ही रस्त्याने चालणाऱ्या महिला शिक्षिकेच्या गळ्यातील चैन चोरुन पळ काढला होता.
अवघ्या २० मिनीटांच्या कालावधीत चोरट्यांनी दोन महिलांना लक्ष करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली होती. याप्रकरणी कोळसेवा़डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्याचा तपास सुरु केला. कल्याणचे सहाय्यक पोलिस निरिक्षक कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या पथकाने परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पहाणी केली. सीसीटिव्ही मध्ये दोन्ही चोरटे कैद झाले होते. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांंनी अवघ्या १२ तासात आकाश उर्फ बाबू पारचे व कुणाल देहडे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे तपास केला असता आकाश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात याआधी देखील विविध पोलिस ठाण्यात सोनसाखळी व मोटार सायकल चोरीचे तब्बल २५ गुन्हे दाखल आहेत. यातील आकाश हा सराईत गुन्हेगार असून महिनाभरापूर्वीच तो जेलमधून बाहेर आला होता. जेलमधून बाहेर येताच त्याने आधी बाईक चोरी केली, त्यानंतर साथीदाराच्या मदतीने सोनसाखळी चोरीचे गुन्हे त्याने सुरु केले.