मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) गुजरातमधील वापी येथे मेफेड्रोनचा कारखाना उदध्वस्त केला असून त्याप्रकरणी १८० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. आरोपींना मेफेड्रोन निर्मितीमध्ये मदत करणाऱ्या ४६ वर्षीय व्यक्तीला डीआरआयने मुंबईतून अटक केली. आरोपीला गुजरात डीआरआयच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील जीआयडीसी वापी येथे मेफेड्रोनची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून डीआरआयने कारखान्याच्या मालकासह तिघांना अटक केली होती. यावेळी कारखान्यातून सुमारे १२१ किलो द्रवस्वरूपातील मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. त्याची किंमत १८० कोटी रुपये आहे. याप्रकरणी मालक राजू नरेंद्र सिंह (४२), प्राइम पॉलिमर इंडस्ट्रीजचे अकाऊंटंट केयूर पटेल (३१), फुटील यादव, कुंदन यादव (३०) यांना गुजरातमधून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपींना मेफेड्रोन निर्मितीत मदत करणाऱ्या आरोपीला डीआरआयने मुंबईतून अटक केली आहे.