पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अपहरण, खून, अत्याचार, हाणामारी, तोडफोड यासारख्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यातच आता पुण्यामध्ये २५ लाखांच्या खंडणीसाठी ओला-उबर चालकाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. आर्थिक वादातून या चालकाचे अपहरण करण्यात आले असून पुणे पोलिसांनी तीन दिवसांनी सांगलीतून या चालकाची सुखरुप सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना देखील अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात आर्थिक वादातून २५ लाखांच्या खंडणीसाठी ओला-उबर चालकाचे अपहरण करण्यात आले होते. गुन्हे शाखा आणि उत्तमनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपींना अटक केली. अपहरण केलेल्या २७ वर्षीय चालकाची पोलिसांनी सांगलीच्या विट्यातून सुखरूप सुटका केली. या चालकाचे अपहरण करुन आरोपींनी त्याला शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवले होते.
शुक्रवारी ४ ऑगस्टला रात्री साडेआठच्या सुमारास कोंढवे येथील धावडे परिसरातून या चालकाचे अपहरण करण्यात आले होते. अपहरण करण्यात आलेला चालक त्याच्या पत्नीसोबत कोंढव्यातील धावडे परिसरात राहत आहे. हा चालक मूळचा सांगलीचा आहे. ओला-उबरला गाडी चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. अशामध्ये त्याचे २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. या चालकाच्या पत्नीने याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत तिसऱ्या दिवशी ओला-उबर चालकाची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली. अक्षय मोहन कदम (वय २८), विजय मधुकर नलावडे (वय २६), महेश मलिक नलावडे (वय २५), बोक्या ऊर्फ रंजीत दिनकर भोसले (वय २६), प्रदीप किसन चव्हाण (वय २६) आणि अमोल उत्तम मोरे (वय ३२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सर्व आरोपी सांगलीमध्ये राहतात.
चालकाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत असे सांगितले की, रात्री आठ वाजताच्या सुमारास त्या कामावरून घरी आल्या होत्या. त्यावेळी अक्षय हा त्यांच्या घरी आला. त्याच्यासोबत इतर साथीदार देखील होते. पोलीस असल्याचे सांगत त्यांनी नवऱ्याबद्दल विचारणा केली. फोन लावून त्यांना घरी बोलावण्यात आले. पती घरी आल्यानंतर त्यांनी त्याला मारहाण केली आणि जबरदस्तीने घराबाहेर नेले. त्यानंतर गाडीमध्ये बसून ते त्यांना घेऊन गेले. चालकाचे अपहरण करणारा मुख्य आरोपी अक्षय हा त्यांच्याच गावातील आहे. अक्षय दिल्ली येथे सोन्या-चांदीचा व्यवसाय करतो. ओला-उबर चालक २०२१-२२ मध्ये अक्षयकडे दिल्लीत कामाला होता. तेथे त्यांचा आर्थिक कारणातून वाद झाला. नोव्हेंबरमध्ये ते तेथून आपल्या गावी परत आले. काही दिवसांपूर्वी हा वाद मिटला होता. पण अचानक त्यांनी चालकाचे अपहरण केले.