पुणे : वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावून गांजाची तस्करी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक कोटी चार लाख रुपये किमतीचा ५२० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक दोनने नगर रस्त्यावर ही कारवाई केली. संदीप बालाजी सोनटक्के (वय २९, रा. रायगड), निर्मला कोटेश्वरीमूर्ती जुन्नरी (वय ३६, रा. गट्टुर, आंध्र प्रदेश), महेश तुळशीराम परीट (वय २९, रा. रायगड) असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यात कोणीही अडवू नये म्हणून ‘महाराष्ट्र शासन’ पाटी लावल्याचे आरोपींनी सांगितले. आंध्र प्रदेशातून नगर रस्त्यावर कारमधून गांजा वाहतूक होणार असल्याची माहिती अंमलदार योगेश मांढरे यांना मिळाली होती. पथकाने सापळा रचून नगर रस्त्यावर दोन संशयित वाहने थांबवली. वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा भरलेल्या बॅगा आढळून आल्या. पोलिसांनी महिलेसह तिघांना ताब्यात घेतले. आरोपींच्या कारमध्ये एक कोटी चार लाखांचा ५२० किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा, दोन कार आणि मोबाइल असा एक कोटी १९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक शुभांगी नरके, अंमलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले, संतोष देशपांडे, युवराज कांबळे, प्रशांत बोमदंडी, संदीप जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.