ठाणे : ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात ओढून सायबर भामट्यांनी ठाण्यातील तिघांना तीन वेगवेगळ्या प्रकरणांत लाखो रुपयांचा गंडा घातला असून फसवणुकीचा एकूण आकडा सुमारे १ कोटी ३७ लाख रुपये आहे. यातील एका व्यक्तीची ७७ लाख ९१ हजारांची फसवणूक झाली असून याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, सायबर गुन्हेगारी रोखण्यामध्ये पोलिस प्रशासन अपयशी ठरले असून ही गुन्हेगारी नियंत्रणात येणार कधी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
कळवा परिसरात राहणारे चेतन (नाव बदलले आहे) खासगी कंपनीत काम करतात. त्यांना ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असा मेसेज आला. त्यामुळे ते टास्क पूर्ण करत गेले. या कामाचे चेतन यांना काही पैसे मिळाले. नंतर सायबर भामट्यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी करत बिटकॉइन विकत घेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी कृती केली. परंतु, वेळोवेळी नफा झाल्याचे सांगून बिटकॉइन विकत घेण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून भामटे पैसे उकळू लागले. मात्र, अचानक भामट्यांनी तुम्हाला तोटा झाला असून तो भरून काढण्यासाठी त्यांच्याकडे तीन लाखांची मागणी केली. अशा प्रकारे भामट्यांनी चेतन यांच्याकडून लाखो रुपये उकळल्यानंतर त्यांनी हे पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे मिळाले नाहीत. याबाबत विचारणा केल्यानंतर भामट्यांनी तुमचे गुण ९० आहेत. ते वाढवण्यासाठी २० लाख भरावे लागतील, असे सांगितले. त्यांनी २० लाख रुपये दिल्यानंतर कराच्या नावाखाली भामट्यांनी त्यांच्याकडून १३ लाख रुपये घेतले. नंतर २३ लाख रुपये दोन टप्प्यांमध्ये भरल्यानंतर भामट्यांनी त्यांच्याकडे १० लाखांची मागणी केली. त्यावेळी फसवणूक झाल्याचे चेतन यांच्या लक्षात आले. एकूण ७७ लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याने चेतन यांनी दिलेल्या तक्रारीनंतर भामट्यांविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
कळव्यातील आणखी एका व्यक्तीची २४ लाखांची ऑनलाइन फसवणूक झाली असून या व्यक्तीला सायबर भामट्यांनी ऑनलाइन ट्रेडिंग करून पैसे कमवण्याबाबत मेसेज पाठवला. नंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये काही रक्कम पाठवली. तसेच, त्यांचा विश्वास संपादन करत भामट्यांनी त्यांच्याकडूनही लाखो रुपये उकळले असून या प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्यातील घोडबंदर भागात वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीलादेखील भामट्यांनी ३५ लाख ८४ हजारांचा ऑनलाइन गंडा घातला आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या तिन्ही गुन्ह्यातील फसवणुकीचा आकडा सुमारे १ कोटी ३७ लाखांच्या आसपास आहे.