मुंबई : देशातील १७० वर्षे जुन्या भायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार मिळाला आहे. प्राचीन वैभव जपल्याबद्दल, सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. प्रमाणपत्रासह युनेस्को एशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा पुरस्कार प्राप्त झाला. यामुळे मुंबई-महाराष्ट्रासह देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. युनेस्को’ही संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना आहे.
भायखळा रेल्वे स्थानक हे भारतातील सर्वात जुन्या कार्यरत रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. भायखळा स्थानकाच्या प्राचीन वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्याचा प्रकल्प रेल्वे प्रशासनाने हाती घेतला. जुलै २०१९ मध्ये सुरू झालेल्या प्रकल्पाचे समन्वयन ‘आय लव्ह मुंबई’च्या विश्वस्त शायना एनसी यांनी केले.
वारसा वास्तू संवर्धनासाठी कार्यरत प्रसिद्ध वास्तुविशारद आभा लांभा आणि बजाज ट्रस्टने सामाजिक दायित्व निधी (सीएसएआर) अंतर्गत हा प्रकल्प साकार केला. स्थानकाचे प्रवेशद्वार, खिडक्या, फसाड यांचे काम यावेळी करण्यात आले. सुरुवातीला १८ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. करोनामुळे लांबल्याने तीन वर्षांनंतर संवर्धनाचे काम पूर्ण झाले. प्रकल्पासाठी चार कोटींचा खर्च आला. २९ एप्रिलमध्ये स्थानकाच्या वारसा वास्तूचे जतन आणि संवर्धनाचे काम पूर्ण झाले आणि स्थानकाला नवी झळाळी मिळाली. विशेष म्हणजे स्थानकात गॉथिक शैलीतील वास्तुकलेचे रेखाटन आहे. वारसा वास्तूचे जतन आणि संवर्धनामुळे युनेस्को पुरस्कार प्राप्त झाला आहे. नुकताच शायना चुडासामा मुनोत, मीनल बजाज आणि आभा नारायण लांबा यांना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते हा कौतुकास्पद पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.